जळगाव लाईव्ह न्यूज । आखाती देशांमधील युद्धामुळे भारतात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून यामुळे छोटे-मोठे हॉटेल्ससह उद्योग धंदे धोक्यात आले आहेत. अशातच गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर देशासाठी काहीशी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, इराणने एलपीजीने भरलेल्या दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या खाडीतून मार्गक्रमण करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात गॅस पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन निघालेले एक टँकर शनिवारी भारतात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. एका टँकरमध्ये साधारणतः १० हजार ते ४५ हजार मेट्रिक टन एलपीजी साठवलेले असते. या प्रमाणातील गॅसमधून अंदाजे १० लाख ते ३१ लाख घरगुती गॅस सिलिंडर भरता येऊ शकतात.या घडामोडींमुळे देशातील घरगुती गॅसच्या संभाव्य तुटवड्याबाबत काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, पुढील काही दिवसांत गॅसचा पुरवठा अधिक स्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

होर्मुज सामुद्रधुनी बंद असल्याने निर्यात आणि आयात थांबली. अनेक देशात तेलाची आणि गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. भारतातही मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माणझाल्यामुळे व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीत. अनेक उद्योग यामुळे धोक्यात आली. मात्र, भारताला मोठा दिलासा इराणकडून देण्यात आला.
चर्चेनंतर भारताचे जहाज होर्मुज सामुद्रधुनीमधून सोडले जात आहेत.इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, भारतीय जहाजांनी त्यांचा झेंडा लावावा आणि इराणी नाैदलाच्या संपर्कात राहावे. इराणकडून होर्मुज सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या जहाजांवर थेट हल्ला केला जात आहे आणि पेटून दिली जात आहेत. भारतासोबतची मैत्री कायम ठेवत इराणकडून भारतीय जहाजांना होर्मुज सामुद्रधुनीचा वापर केला जाऊ दिला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनीवरून दोन भारतीय जहाज भारताच्या दिशेने निघाले आहेत. सुरक्षित रस्ता इराणकडून या दोन्ही जहाजांना देण्यात आला. हे दोन जहाज भारतात काही तासात दाखल होतील. यामुळे सध्या असलेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्यातून नक्कीच थोडातरी दिलासा भारताला मिळेल.











