
जळगाव लाईव्ह न्यूज । अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करतील. मोदी सरकारच्या (Modi Sarkar) तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरे आणि निर्मला सीतारामन यांचे आठवे अर्थसंकल्पीय भाषण असेल. अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता एक दिवसाचा अवधी शिल्लक राहिला आहे. या अर्थसंकल्पामध्ये काय स्वस्त होणार? काय महाग होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी जुलैमध्ये सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सोन्याच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यासारखी मोठी घोषणा केली होती. त्यावेळी सोन्याच्या वाढत्या किमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्र्यांनी कस्टम ड्युटी 15 वरून 6 टक्क्यांवर आणली होती. यानंतर दिल्लीसह विविध शहरांमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 5000 रुपयांहून अधिकची घसरण दिसून आली.
मागणी दररोज 20 टक्क्यांनी वाढली होती
भावात घसरण झाल्याने सोन्याची मागणी अचानक वाढली होती. 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर, सोने खरेदी करण्यासाठी लोकांनी ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी केली होती. लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने सोन्याची मागणी आणखी वाढली होती. कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्यापूर्वी सोन्याचा दर 74,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यावेळी वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या रोजच्या मागणीत २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे ज्वेलर्सकडून सांगण्यात आले.
अर्थसंकल्पात (२३ जुलै) कस्टम ड्युटी कमी करण्याच्या घोषणेनंतर सोन्याचा भाव एका दिवसात ७२,६०९ रुपये प्रति १० ग्रॅमवरून ६९,१९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर घसरला. एकाच दिवसात सोन्याचा दर 3500 रुपयांच्या आसपास खाली आला होता. म्हणजेच 24 जुलै 2024 रोजी सोन्याचा दर 69,194 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. इतकेच नाही तर 26 जुलै रोजी ते 6,741 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 6,7410 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. अशा प्रकारे आठवडाभरात सोन्याच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण झाली होती.
यावेळी अर्थमंत्र्यांकडून ज्वेलर्सना काय अपेक्षा आहेत?
सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी ज्वेलर्स आणि सराफा विक्रेते करत आहेत. सोन्याचा दर 83000 रुपयांच्या पुढे गेला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी काही पावले उचलावीत, अशी मागणी ज्वेलर्स आणि सराफा विक्रेत्यांनी केली आहे. मध्यमवर्गीयांना EMI द्वारे दागिने खरेदी करण्यास मदत करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी एक प्रणाली तयार करावी, अशी मागणी सराफा व्यापाऱ्यांनी केली.