जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२५ । अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध चांगलेच भडकले थेट परिणाम सोन्यासह चांदीच्या दरावर दिसून आला. जळगावच्या सुवर्णनगरीत सलग तिसऱ्या दिवशी सोने चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. एका दिवसात सोने १९०० रुपये प्रति तोळ्याने महागले आहे. यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह ९६ हजाराच्या उंबरवठ्यावर पोहोचला आहे. तर चांदी दर प्रति किलो १००० रुपयांनी वाढला.

लग्नसराईच्या हंगामाआधी सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्याला आज मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर सोन्यात मोठी वाढ झाली. जळगाव सराफ बाजारात गेल्या तीन दिवसात सोने ४४०० रुपयांनी वधारले आहे. तर चांदी देखील ४हजार रुपयांनी महागली आहे.
काय आहे आजचे दर?
शुक्रवारी झालेल्या दरवाढीनंतर आज शनिवारी सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८५,४३६ प्रति तोळा इतका आहे. तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर विनाजीएसटी ९३,२०० रुपये (जीएसटीसह ९५,९९६) पोहोचला आहे. चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी ९५००० रुपयावर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात ट्रम्प सरकारच्या टेरिफ धोरणाचे पडसाद सोने दरावर होऊन घसरण झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसात घसरण दिसून आली. मात्र बुधवारपासून सोने चांदी दरात वाढ होऊ लागली. त्यात सोने दर मोठ्या प्रमाणावर घसरून प्रती तोळा ५५ हजार रुपयापर्यंत खाली येण्याचे वृत्त आल्याने भीतीपोटी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर सोने विक्रीचा सपाटा लावला होता.