जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२६ । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर बऱ्यापैकी स्थिरावले होते. दोन्ही धातू दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आज बुधवारी सकाळी सोन्यासह चांदी दरात मोठी उसळी दिसून आली. यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोन्याचा दर
आज बुधवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दरात १ तोळ्यामागे तब्बल ३७६० रुपयांनी वाढ झाली. यामुळे सोन्याचा दर १,४६,६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,३४,४५० रुपये इतका झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा दर ११,००१० रुपये इतका झाला आहे.

चांदीचा दर
सोन्यासहित चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. एक किलो चांदी अडीच लाखांवर पोहोचली आहे. एक किलो चांदीच्या दरात तब्बल १५ हजारांनी वाढ झाली आहे. चांदीच्या एका ग्रॅममागे तब्बल २५० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम दोन्ही धातुंच्या दरवाढीवर होत आहे. डॉलरच्या मूल्यातील चढउतार, व्याजदरातील बदल तसेच विविध देशांमधील भू-राजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळत असून दरात वाढ होत आहे. सणासुदीचा हंगाम, लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी वाढती मागणी यामुळे पुढील काळातही दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.











