जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२६ । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीत दरात तुफान वाढ झाल्याने दोन्ही धातूंनी ऐतिहासिक पातळी गाठली. मात्र गेल्या दोन दिवसापासून घसरणीला ब्रेक लागला. दोन दिवसांतच सोन्याच्या दरात तब्बल 20 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात थेट 1 लाख रुपयांची घसरण झाल्याने बाजारात खळबळ उडाली असून, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. Gold Silver Price Today

दरम्यान, उद्या म्हणजेच रविवारी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, पण त्याआधीच सोन्यासह चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी सोने पावणे दोन लाखांच्या आसपास, तर चांदी चार लाखांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली होती. मात्र, हीच तेजी आता तितक्याच वेगाने ओसरताना दिसत आहे. घसरण झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या दोन दिवसांत २४ कॅरेट सोने दरात तब्बल २० हजार रुपयांची घसरण झाली. दोन दिवसांपूर्वी १ लाख ८० हजार रुपयांवर पोहोचलेले सोने, आज १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही अभूतपूर्व घसरण नोंदवली गेली आहे. चार लाख रुपयांवर गेलेली चांदी, अवघ्या दोन दिवसांत थेट १ लाख रुपयांवर घसरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण पहिल्यांदाच झाल्याने सुवर्ण व्यवसायिक आणि गुंतवणूकदार दोघेही संभ्रमात सापडले आहेत.












