जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२६ । एकीकडे आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला असताना इंधन, गॅसचे दर वाढले. तर दुसरीकडे या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट नोंदविण्यात आली. यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला.

काय आहेत सोन्याचा दर
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज गुरुवारी बाजारपेठ उघडल्यावर २४ कॅरेट सोने दरात ७२१ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६५ हजार १०९ रुपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी काल बुधवारी सोने दरात ५१५ रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६५ हजार ८३० रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र आज घसरण दिसून आली.

चांदीचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर चांदी दरात प्रति किलो ७२१० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७५ हजार ०१० रुपयांपर्यंत घसरले. यापूर्वी काल बुधवारी दिवसभरात चांदी दरात ५१५० रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८२ हजार २२० रुपयांपर्यंत खाली आले होते.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम सोने आणि चांदी यासारख्या मौल्यवान धातुंच्या बाजारावर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात विशेषतः सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरू असून गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळताना दिसत आहे. अलीकडील काळात सोन्याच्या किमतीत वाढीचा कल दिसून येत आहे.












