जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२५ । ‘गगनभेदी’चे पत्रकार अनिल थत्ते यांच्या व्हायरल क्लिपचा पुरावा देत शरद गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर मोठं विधान केलं आहे. महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा सनसनाटी आरोप केला असून याबाबत गृहमंत्री अमित शहा यांना भेटून यासदंर्भात विचारणार असल्याचं खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसेंनी पत्रकाराचे पुरावे देत गिरीश महाजनांवर जे आरोप केले होते, ते त्यांनी फेटाळले आहेत

काय म्हणाले मंत्री महाजन?
मी जर एक गोष्ट सांगितली तर लोकं यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांनी मारतील. मी त्यांच्या एवढा खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. कुठल्या तरी गोष्टीचा एकतरी पुरावा त्यांनी द्यावा, गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा करायची, घाणेरडं वक्तव्य करायचं, कमरेखालची भाषा करायची. काहीही सिद्ध करता येत नाही, आरोप करता येत नाही. त्यामुळे फक्त ते चारित्र्यहरण करतात, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही. माझं त्यांना आव्हान आहे की, त्यांनी एक पुरावा दाखवावा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल, असं म्हणत गिरीश महाजनांनी आरोपांचं खंडण केलंय.
नाथाभाऊ नेमकं काय म्हणाले होते?
एकनाथ खडसे म्हणाले की, एका पत्रकाराने आपली क्लिप प्रकाशित केली. त्यात असं म्हटलं आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणं उचित राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मला वाटते की, खरोखर गिरीश महाजन यांचे १० वर्षाचे सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शाहांना भेटणार आहे. त्यावेळी मी त्यांना विचारणार आहे की, हे खाली जे चाललं आहे ते काय आहे? असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे