जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२४ । काल मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत विकासनिधीच्या वाटपावरून राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते.
ग्रामविकास विभागाला २५/१५ योजनेसाठी अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अर्थमंत्री अजित पवारांकडे केली. मात्र यानंतर पैसे कोठून आणू…आता काय जमिनी विकायच्या का? अशा शब्दांत अजित पवार यांनी महाजन यांना सुनावले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी उडाली. विशेष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष या दोन दिग्गज नेत्यांमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धामुळे कॅबिनेटमधील अन्य सदस्यही अचंबित झाले.
त्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला. आपल्या गटाचे आमदार असलेल्या सिन्नर मतदारसंघातील एका स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनी मंत्रिमंडळात मांडला होता. हा धागा पकडत ‘नको तिथे खर्च नको अशी तुमची भूमिका असेल तर मग इथे खर्च कशाला?’ असा सवाल महाजन यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सूत्रांनी सांगितले.
एकीकडे येत्या दोन तीन महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार असून याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चांवरून चलबिचल सुरू असताना आता नेत्यांमध्येही सर्वकाही आलबेल नाही हे दिसून येतंय.