‘त्या’ तरुण सरपंचाच्या आरोपानंतर गिरीश महाजनांनी केली कारवाई, बीडीओ निलंबित
जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२३ । छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीसमोर एका तरुण सरपंचाने पंचायत समितीसमोर तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा उधळल्याचा व्हिडीओ राज्यभरात व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली असून ज्या बीडिओंवर त्यांनी आरोप केले त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले.
नेमका प्रकार काय?
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावातील कोरडवाहू शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून विहिरी घ्यायच्या होत्या. मात्र त्यांना विहिरी मंजूर करण्यासाठी बी.डी.ओ व इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे लाच मागितली, असा आरोप सरपंच मंगेश साबळे यांनी केला. साबळे यांनी शेतकऱ्यांकडून १०-१० हजार गोळा केले अन् थेट फुलंब्रीचं पंचायत समिती ऑफिस गाठलं.
तेथे त्यांनी दोन लाख रुपये पंचायत समितीच्या आवारामध्ये उधळले होते. याबाबत व्हिडीओ राज्यभरात तुफान व्हायरल झाला होता. यानंतर या प्रकरणाची दखल मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आहे. ज्या बीडिओंवर त्यांनी आरोप केले त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले. ज्योती कवडदेवी असं बीडीओंचं नाव आहे. शिवाय प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश मंत्री महाजन यांनी दिले आहेत.