⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

महागाईचा दुहेरी झटका ! पेट्रोल डिझेलनंतर आता गॅस सिलेंडरही महागले, जाणून घ्या नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्यानंतर आज घरगुती एलपीजी गॅस महागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जळगावात १४ किलोचा गॅस सिलिंडर ९५४.५० रुपयांचा झाला आहे. यापूर्वी ते ९०५ रुपये होते. दरम्यान, एलपीजी गॅस महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

सिलिंडर 50 रुपयांनी महागला

आजपासून 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे. अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहेत. साधारण पाच महिन्याच्या कालावधीनंतर सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

5 आणि 10 किलोचा सिलेंडरही महाग
तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातच नाही तर 5 किलो आणि 10 किलोच्या सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे. आता 5 किलोचा एलपीजी सिलेंडर 349 रुपयांना आणि 10 किलोचा सिलेंडर 669 रुपयांना मिळणार आहे. इतकेच नाही तर 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही 2,003.50 रुपयांवर पोहोचली आहे.

दोन वर्षात कोरोनाच्या काळात अर्थिक संकटात सापडलेला सामान्य नागरिक नुकताच उभारी घेत होता. एकाचवेळी सगळेचं दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनता यामध्ये होरपळली जाईल. विशेष म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे दर वाढले

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती 40 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांनी देशांतर्गत पातळीवर एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करणे आवश्यक झाले आहे.