जळगावात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे जप्त

मार्च 8, 2026 12:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य प्रदेशातून जळगाव शहरात अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीवर जिल्हापेठ पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून ८ गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे ३.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

New Project 1

या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उपस्थित होते. जळगावातील यश रामदास नन्नवरे (२७) हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांना मिळाली. त्यांच्या पथकाने यश नन्नवरे याला ताब्यात घेत एक गावठी कट्टा हस्तगत केला. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने तो कट्टा केशव सुनील भालेराव (रा. वरणगाव, ता. भुसावळ) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

केशव भालेराव याला खाक्या दाखविताच त्याने दोन कट्टे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे, ता. यावल) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यापैकी एक कट्टा यशला आणि दुसरा कट्टा गौरव देविदास साळवे (रा. पिंप्राळा) याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार गौरव यालादेखील अटक करून त्याच्याकडून १ गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे आणि दुचाकी (एमएच १९, सीएम १३१२) हस्तगत केली.
समाधान निकम याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल आहे. तर केशव हादेखील एका गुन्ह्यात पोलिसांना सापडत नव्हता. त्याचप्रमाणे गौरव साळवे हा पिंप्राळा येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांचा मित्र आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now