जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आता चोरट्यांनी मद्यविक्री केंद्रांनाही लक्ष्य केले आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाणे रोड परिसरात एका बिअर बारमध्ये धाडसी घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे.

अमोल गोपाळ साळी (वय ३९, रा. राजराजेश्वरी अपार्टमेंट, जळगाव) यांचे आव्हाणे रोडवरील ‘हॉटेल न्यू नाईट किंग अँड वाईन पॅलेस’ या बिअर बारमध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश करून चोरी केली. मंगळवार, २४ मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजेपासून ते बुधवार, २५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत दुकान बंद असताना ही घटना घडली.

चोरट्यांनी हॉटेलच्या खिडकीचे लोखंडी ग्रील वाकवून आत प्रवेश केला आणि काउंटर तसेच स्टोअरमधून सुमारे १५ हजार ८३० रुपये किमतीच्या विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या चोरून नेल्या. सकाळी दुकान उघडल्यानंतर ही बाब लक्षात आली आणि चोरीचा प्रकार उघड झाला.
या प्रकरणी हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे.










