घरफोडी करणारी अट्टल गॅंग पकडली, ६ जणांकडून २ गुन्हे उघड

ऑक्टोबर 10, 2021 1:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्या करणारी अट्टल गॅंग शनिवारी पकडण्यात आली आहे. डीबी पथकाने सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत. चोरट्यांनी दोन गुन्ह्यातील ५३ हजारांचा मुद्देमाल व पाच हजार रुपये रोख रक्कम काढून दिली आहे.

Untitled design 2 jpg webp

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राधाकृष्ण नगरात असलेल्या एस.के.ऑइल मीलच्या मागील बाजूला एक बांधकाम साईट सुरू आहे. दि.२९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी साईटवरून लोखंडी गज, प्लेट असा ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी साईटवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात फारसे काहीही दिसून आले नाही. डीबी पथकातील कर्मचारी भास्कर ठाकरे व प्रणेश ठाकूर यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली असता चोरट्यांची नावे निष्पन्न झाली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील भास्कर ठाकरे, प्रणेश ठाकूर, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, संतोष खवले, गणेश पाटील, योगेश बोरसे, तेजस मराठे, रतन गिते, योगेश इंधाटे यांनी सापळा रचून संदीप ठोके, आकाश बर्वे, विशाल जाधव, रईस पठाण, किरण बाविस्कर, गौरव साळुंखे यांना अटक केली.

चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी साईटवरून चोरलेल्या मालापैकी ५३ हजारांचा मुद्देमाल काढून दिला आहे. तसेच संशयितांपैकी रईस समशेर पठाण याने आणखी इतर दोघांसह गेंदालाल मील परिसरातील शेख रफिक रशीद यांच्या घरातून दि.६ ऑक्टोबर रोजी ५ हजार रोख चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच रक्कम देखील काढून दिली आहे. चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून दोघांचा शोध सुरू आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now