⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | गणेश मंडळांच्या सूचनांचे पोलिसांकडून स्वागत, तर कार्यकर्त्यांना दिले सल्ले

गणेश मंडळांच्या सूचनांचे पोलिसांकडून स्वागत, तर कार्यकर्त्यांना दिले सल्ले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १६ सप्टेंबर २०२३ | गणेशोत्सव काळात आणि विसर्जन मिरवणुकीला काही अडचणी येत असतात. गणेश मंडळांनी शांतता समितीच्या बैठकीत मांडलेल्या सूचनांचे आम्ही स्वागत करतो. गणेशोत्सवात काही समाजकंटक वाद घालत असतील किंवा विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील तर पोलीस ३० तारखेला त्यांचा समाचार देखील घेऊ शकतात, असे शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांनी सांगितले.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून शनिवारी सायंकाळी पोलीस मंगलंम हॉलमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील, शहरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, सार्वजनिक गणेश महामंडळाचे पदाधिकारी, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, मुस्लीम समाज प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत म्हणाले की, गणेश मंडळांत आणि बाहेरील परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून काही अनुचित प्रकार घडल्यास ते त्यात कैद होईल. तसेच गणेशोत्सव झाल्यावर ते सीसीटिव्ही कॅमेरे पोलिसांसाठी देण्यात यावे, अशी आम्ही विनंती केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गावीत यांनी सांगितले. तसेच आजवर जळगाव शहरातील गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा झाला आहे. यंदाही आम्ही आपल्याला ग्वाही देतो की गणेशोत्सव जल्लोषात आणि शांततेत साजरा होईल. आभार प्रदर्शन परिरक्षावधीन पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी यांनी केले.

आ.राजुमामा भोळे यांनी, गणेशोत्सव आपल्या सर्वांचा आहे असा साजरा करायला हवा. शिवजयंती, गणेशोत्सवात धर्मभक्तीसोबतच देशभक्तीचा गजर असतो. राष्ट्र आणि आई – वडिलांना महत्त्व द्यायला हवा. लोडशेडींग न केल्यास लोक पाण्याचा उपसा जास्त करतील आणि भविष्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती होती, पण आता पाऊस चांगला पडल्याने बहुदा ती समस्या दूर होणार आहे. शहरात कुठेही सीसीटिव्ही कॅमेरे बसवायचे असतील तर मी सहकार्य करण्यास तयार आहे. आपण सांगाल तेवढ्या कॅमेऱ्याचा अर्धा खर्च देण्यास मी तयार आहे. आज मी आमदार असलो तरी नगरसेवक असल्यापासून मी महामंडळाचा सदस्य आहे. कार्यकर्ता म्हणून आपण सांगाल ती जबाबदारी पार पाडण्यास मी तयार आहे, असे आ. राजुमामा भोळे म्हणाले.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार म्हणाले की, गणेश मंडळांकडून आलेल्या सूचनांचे आम्ही स्वागत करतो. आमच्याकडून करायच्या सुधारणा आणि बदल आम्ही करू आणि इतर विभागाकडून करवून घेऊ. मला एका वरिष्ठांनी सांगितले होते की, कोणत्याही विभागाची तक्रार असेल तर ते त्यांच्याकडून होत नसेल तर तुम्ही करा नाहीतर उद्या ते वाढून पोलिसांच्या हाती येणारच आहे. त्यामुळे आम्ही स्वतःच सर्व करवून घेणार आहोत. आम्हाला सर्व दिवस एकच काम आहे. २८ आणि २९ रोजी जर तुम्हाला काही वाटत असेल तर लक्षात ठेवा ३० तारखेला देखील आम्हाला आमचेच कर्तव्य आहे. आमच्या नजरेतून कुणीही बाहेर जाऊ शकत नाही, कोणत्या कलमात कुणाला बसवायचे आणि कसे बसवायचे हे आम्हाला चांगले येते. मंडळ उभारताना कमीत कमी एक रुग्णवाहिका जाऊ शकेल इतकी जागा मोकळी असू द्या. बॅनरबाजी करणे, झेंडे लावण्याची ही वेळ नाही. बाप्पाच्या उत्सवात वेगवेगळ्या रंगाचे झेंडे लावून कोणताही वाद उभा करू नका. काही कार्यकर्त्यांनी स्वतःचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे कुटुंब, महिला, भगिनींना सहभाग असावा. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक विभाग प्रमुख, वकील, डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, कलावंत यांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. आम्ही पण परिवारासह गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येणार आहोत त्यामुळे मला गणवेशात येण्यास भाग पाडू नका. आपल्याकडून मला शांततेचा शब्द मिळाला तर इतर संवेदनशील भागात आम्हाला बंदोबस्तासाठी मनुष्यबळ पाठविणे शक्य होईल, असे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले.

मुकूंद मेटकर यांनी, महाराष्ट्र राज्य शासनाने ज्या मंडळांनी गेल्या ५ वर्षात काहीही वाद निर्माण केले नाही त्यांना ५ वर्षासाठी परवानगी देण्यात यावी, असे आदेश पारित केले आहे. जळगाव शहरातून त्या आदेशाची अंमलबजावणी करावी. महावितरण विभागाकडे विशेष लक्ष देत त्यांना विद्युत पुरवठा खंडित न होऊ देण्याची व्यवस्था करावी.

माजी उपमहापौर करीम सालार यांनी, सार्वजनिक गणेश महामंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मस्जिद आणि मुस्लीम सामाजिक संघटनाच्या प्रतिनिधींनी देखील पोलिसांसाठी एक कॅमेरा द्यावा, अशी विनंती केली. तसेच मी आणि एजाज मलिक यांच्यातर्फे शानिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीसाठी ५ कॅमेरा आणि महामार्गावरील चौकासाठी ५ कॅमेरे देण्याचे सालार यांनी जाहीर केले. अयाज अली यांनी, जळगाव एकमेव असे शहर आहे ज्याठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलाल ऐवजी फुलांची उधळण होते. यंदा गणेश विसर्जनाच्या दिवशी ईद मिलाद असल्याने तो सण एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे ते म्हणाले.

सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी, गेल्या ३० वर्षापासून एक सहविचारांचा सहवास सुरू आहे. जिथे दोन भावांचे जमत नाही तिथे एका धर्मासाठी दुसरा धर्म आपला सण पुढे ढकलत असेल तर आपली जबाबदारी वाढते. आमचा कोणताही कार्यकर्ता तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही आम्ही देतो, असे सांगितले. दोन्ही वेळेच्या पूजेत महिला, माता भगिनींचा, सैनिक, माजी सैनिक, समाजातील दुर्लक्षित लोकांचा सहभाग वाढवावा. प्रत्येक मंडळांनी आपल्या गणेशमूर्तीची काळजी घ्यावी. निर्माल्य रथ आरोग्य विभागाचा नव्हे तर बांधकाम विभागाचा असावा. जिल्हा बैठक झाल्यापासून आजपर्यंत महावितरण मुख्य अभियंत्यांची वेळ मिळालेली नाही. ते जर आपला अहंकार दाखवत असेल तर मग कार्यकर्ते देखील दाखवतील. एक खिडकी योजना एक विनोद झाला आहे. तिन्ही विभागाचे प्रतिनिधी उपस्थित राहत नाही. प्रशासनाने मंडळांचा एक अर्ज घ्यावा आणि परवानगी देण्यात यावी. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष असून प्रत्येक मंडळांनी आरतीच्या अगोदर महाराजांना वंदना द्यायची आहे. सर्व आनंद घेऊ शकतील असा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, असे नारळे म्हणाले.

अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी, गणेशोत्सव १० दिवस असतो आपल्याला ते १० दिवस लक्ष देणे आवश्यक आहे. प्रशासनाचे दृश्य रूप पोलीस असते. पोलीस सर्वांना विघ्न वाटतात परंतु तुमचं सर्व निर्विघ्न पार पाडावे यासाठी आम्ही ते विघ्न दूर करतो. आपण कुणाचा तरी कुहेतू साध्य होण्यासाठी साधन बनू नका, अशी विनंती गवळी यांनी तरुणांना केली. आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरा. आपण जेलमध्ये राहाल आणि बाहेर कुणीतरी आपल्यावर हसेल असे होऊ देऊ नका, असे गवळी यांनी सांगितले.

मंडळ कार्यकर्त्यांच्या मागणी
ऑनलाईन परवानगी संकेतस्थळ योग्य पद्धतीने सुरू करावे. मनपा विभागाकडून परवानगी लवकरात लवकर मिळावी. सर्व गणेश मंडळांनी आपल्या मंडळबाहेर शहिदांच्या स्मरणार्थ एक बॅनर लावावे. नवीन मंडळांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी मिळावी.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.