जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहराच्या विकासाला कुणाची तरी दृष्ट लागली असून शहराचा विकास काही केल्या होईना असे होऊन बसले आहे. जळगावात सत्ता कुणाचीही असो विकासासाठी आम्ही एक आहोत असे सर्व सांगत असताना कामात अडथळा निर्माण करणारे देखील तेच असतात. जळगाव शहरात आजवर कोटीच्या कोटी उड्डाण घेणारा निधी आला आणि बराचसा परत देखील गेला. काही कामांना खीळ बसली तर काही लालफितीत अडकली. जळगावकर मात्र सहन करीत बसले. जळगाव शहराच्या विकासाला गणराया पावला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण, इच्छादेवी चौक ते डी मार्ट पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला ग्रीन सिग्नल मिळाला असून सर्व लोकप्रतिनिधींचे त्यासाठी एकमत झाले आहे. Ganaraya, give the same wisdom to the people representatives of Jalgaon
जळगाव शहरवासियांच्या नशिबी थट्टाच लिहिलेली आहे. जळगावचा विकास गेल्या अनेक वर्षापासून एका विशिष्ट चौकटीत बांधला गेला असून त्यापलीकडे जळगावचा विकास होऊच शकलेला नाही. जळगावातील रस्त्यांची तर सद्यस्थिती अशी होऊन बसली आहे कि रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच सांगता येईना. शहरातील काही भागात तर रस्तेच शिल्लक राहिलेले नाही. नागरिकांचे प्रचंड हाल होत असले तरी त्याचे कुणालाही सोयरसुतक नाही. मनपातील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला विचारणा केली तरी मनपा प्रशासन काम करायला पुढे येत नाही.
सत्ताधारी काम करा म्हणून ओरडतात तर विरोधी त्याला जोड देतात पण कुणीही एकमताने मनपा प्रशासनाला धारेवर धरून काम करवून घेत नाही. मनपातील नगरसेवक आणि विविध विकासकामांचे मक्तेदार यांचे असलेले हितसंबंध सर्वांना जगजाहीर आहे. नगरसेवकच काय तर मनपातील अधिकारी देखील त्यात सामील आहेत कि काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. टक्केवारीच्या नावाने नेहमीच ओरड होत असते. जळगावकरांच्या नशिबाची झोळी फाटली आहे असे म्हणण्यापेक्षा ती झोळी योग्य लोकांनी योग्य पद्धतीने पकडलेली नाही असेच म्हणावे लागेल.
जळगाव शहराला दोन मंत्री, एक खासदार, दोन आमदार, ७५ नगरसेवक आणि इतर अनेक प्रभावी लोकप्रतिनिधी लाभले आहेत. जळगावला आजवर कधीच मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले असे काही वाटत नाही. राज्याच्या राजकारणात देखील जळगावचा मोठा बोलबाला आहे परंतु जळगाव शहराकडे जातीने लक्ष द्यायला कुणालाच वेळ राहिला नाही. सर्व फक्त आश्वासने देतात आणि मते मागायला येतात. विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी एकत्र आले असे काही दिसत नाही. विकास करायचा आहे, सर्व मिळून विकास करणार अशी बोलबच्चन नेहमी दिली जाते पण खरा मुद्दा येतो तेव्हा हेच चेहरे एकमेकांकडे बोट दाखवतात. उलटपक्षी जेव्हा वैयक्तिक हिताचा मुद्दा असतो तेव्हा त एकत्र येतात. थोडक्यात सांगायचं तर वॉटरग्रेसला दिलेला मक्ता.
जळगाव शहरात भाजप सरकारच्या पहिले अडीच वर्ष काळात भाजप, सेनेचा विभक्त का असेना सुखात संसार सुरु होता. किमान शिवसेनेकडून भाजपवर वारंवार ब्रम्हास्त्र तरी टाकले जात नव्हते. दीड वर्षापूर्वी भाजपची सत्ता उलथवून टाकत शिवसेनेने सत्ता काबीज केली आणि तेव्हाच माशी शिंकली. भाजप-शिवसेनेतील वाद जळगावात टोकाला गेला. जळगावात भाजप सेनेचे फाटले आणि त्यात राज्यात देखील शिवसेनेत मोठी फूट पडली आणि सर्वच बिघडले. जळगावतील शिवसेना विरुद्ध शिवसेना असे झाले. राज्यात भाजप आणि शिंदे गट एकत्र आहे मात्र जळगावात भाजप विरुद्ध महापौर आणि शिवसेना असे चित्र आहे.
पुढील वर्षी जळगाव मनपाची निवडणूक असून तोवर भाजप आणि जळगाव शिवसेनेचे काही पटणार नाही हे निश्चित होते. जळगावातील लोकप्रतिनिधींना गणपती बाप्पाने सद्बुद्धी दिली असून एका विषयासाठी सर्वच पुढे आले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून श्री विसर्जन मार्गावरील मुख्य रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून महापौर, आमदार, नगरसेवक एकत्र आले असून खासदारांची भेट घेतली आहे. खासदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने इच्छादेवी चौफुली ते डी मार्टपर्यंतचा रस्ता लवकरच तयार केला जाणार आहे.
इच्छादेवी चौक ते मेहरूण तलावाकडे जाणारा रस्ता नेहमीच खराब असतो. काही वर्षांपूर्वी देखील तत्कालीन आ.डॉ.गुरुमुख जगवाणी यांच्या निधीतून रस्ता तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर गणेश विसर्जन सुरळीत पार पडले होते. जळगावातील एका विषयासाठी पहिल्यांदा सर्वपक्षीय आणि विशेषतः भाजप-शिवसेनेचे प्रतिनिधी एकत्र आले असून जळगावकरांसाठी हि आनंदाची बाब आहे. जळगावातील विकासकामांसाठी महापौर जयश्री महाजन (Jayashri Mahajan), आ.राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole), खा.उन्मेष पाटील, आ.चंदूभाई पटेल, नगरसेवक आणि सध्याचे विद्यमान मंत्री ना.गिरीश महाजन व ना.गुलाबराव पाटील एकत्र आल्यास शहराचा नक्कीच कायापालट होईल यात शंका नाही. जळगावचा खरा विकास करण्याचा विडा सर्वांनी उचलला तरच हे शक्य आहे. अन्यथा बाप्पा त्यांची पुढील वेळी परीक्षा घेईल हे निश्चित.