⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मुक्ताई मंदिरासाठी निधी कमी पडू देणार नाही – सुप्रिया सुळे

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी श्रीक्षेत्र कोथळी येथे आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. अपूर्णावस्थेत असलेल्या मंदिर जीर्णोद्धारासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना विशेष विनंती करू. पण, मुक्ताई मंदिराच्या बांधकामाचा प्रश्न मार्गी लावू असे, आश्वासन त्यांनी दिले.


जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी कोथळी येथे संत मुक्ताईंच्या समाधिस्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते मुक्ताईची आरती करण्यात आली. यानंतर त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली. यानंतर संस्थान कडून झालेल्या आगळ्यावेगळ्या स्वागता बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर रवींद्र महाराज हरणे यांच्याकडून ताटीचे अभंग समजून घेतले. मुक्ताई संस्थानच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी विविध विकास कामासंदर्भात खासदार सुळे यांच्यासोबत चर्चा केली. ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुक्ताई दर्शनानंतर खासदार सुळे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेण्यासाठी महामार्गाकडील त्यांच्या फार्महाऊस-कडे कूच केले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुक्ताई संस्थानतर्फे आदिशक्ती संत मुक्ताईंची प्रतिमा देऊन खासदार सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला.