जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२५ । गेल्या दोन-तीन महिण्यापुर्वी पाचोऱ्यात शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईवर डल्ला मारल्याचे मोठे प्रकरण उघडकीस आले होते. तसाच प्रकार आता मुक्ताईनगर तालुक्यातही उघडकीस आला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अनुदानात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महसूलच्या कोतवालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दोन तलाठ्यांच्या निलंबनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली. या प्रकरणात अद्याप अपहाराच्या रकमेचा आकडा स्पष्ट झालेला नाही. दरम्यान याप्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर झाली असून तालुकानिहाय मदतीचे अनुदान वाटपाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातच तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपात लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसे पुरावेही त्यांनी महसूल प्रशासनाला दिले होते.
तहसीलदार गिरीश वखारे यांनी ३ नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर पोलिसांत तक्रार दिली होती. शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उचंदे येथील कोतवाल राहुल रवींद्र सोनवणे याच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली. तर महेंद्र राजेंद्र वंजारी, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, बोरखेडा, के.आर. ठाकूर तत्कालीन तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, उचंदे, मुक्ताईनगर यांच्यावरही ठपका ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.









