⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळात शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का: माजी आ.संतोष चौधरी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

भुसावळात शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का: माजी आ.संतोष चौधरी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुका आता दोन तीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहे. त्यापूर्वी बऱ्याच राजकीय उलथापालथी घडतील, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.अगदी युती व आघाडीतही बिघाडी होऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी होय. चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटातील आहे. मात्र संतोष चौधरी हे आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे.

यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती. पक्ष नेतृत्वाची चर्चा देखील झाली. कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करीत पुरेपूर वातावरण निर्मिती केली. मात्र, पक्षाने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली.

त्यामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांचे बंड क्षमले व त्यांनी श्रीराम पाटील यांचा प्रचार केला. निवडणुकीनंतर चौधरी राजकीय चर्चेपासून दूर होते. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते मुंबईत तळ ठोकून असून, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी त्यांनी दोन वेळा या संदर्भात चर्चा केली आहे.

यामुळे आता भुसावळ शहर आणि विधानसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान, भुसावळ तालुका एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण नंतर तो प्रभाव कमी होत गेला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांचे प्राबल्य वाढत गेल्याने कॉंग्रेसची ताकद कमी झाली. चौधरी यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कॉंग्रेसला निश्चितच बळ मिळू शकेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.