जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । मुक्ताईनगर शहरातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय तंत्र निकेतन संस्थेच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून चार कोटी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी यासाठी सतत पाठपुरावा केला होता. अखेर आमदार पाटीलांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
मुक्ताईनगर येथे २०१५ मध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांकरीता नवीन तंत्रनिकेतन व प्रशासकीय संस्था सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या इमारतीसाठी शासनाकडून एकूण 57.56 कोटीच्या निधीस मंजुरीही देण्यात आली होती. या इमारतीसाठी आजपर्यंत 29 कोटी 20 लाख 60 हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. इमारतीच्या पूर्णत्वासाठी उर्वरीत निधीची आवश्यकता असल्याने तत्कालीन अल्पसंख्यांक राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र शासनाने 25 ऑगस्ट 2022 रोजी परीपत्रक जारी करून मुक्ताईनगर येथील अल्पसंख्यांक समाजाच्या शासकीय तंत्रनिकेतन इमारतीसाठी चार कोटी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून सदरचा निधी शासनाकडून तंत्र शिक्षण संचालनयाला वर्ग केला आहे.