⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगावात गुंडाराज: असोद्यात तडीपार गुंडाकडून गोळीबार!

जळगाव लाईव्ह न्यूज | २१ एप्रिल २०२३ | जळगाव जिल्ह्यात सध्या खून, गोळीबार असे प्रकार वाढले असून अवैध धंद्याच्या स्पर्धेतून वाद होत आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास असोदा गावाजवळ जुन्या वादातून एका तडीपार गुंडाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून अधिक तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरालगत असलेल्या असोदा गावाजवळ असलेल्या हॉटेल आर्याशेजारी एक पत्त्यांचा क्लब सुरू होता. मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील एक तडीपार गुंड त्याठिकाणी पोहचला. जुन्या वादातून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने योगेश उर्फ हृतिक कोल्हे याला धमकी देत हवेत ३ राऊंड फायर केले.

१५ दिवसांपूर्वी देखील दोघांमध्ये वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. तडीपार गुंड हा जळगावातील कासमवाडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. उद्या आखाजीचा सण असून त्यानिमित्ताने जागोजागी पत्त्यांचे क्लब सुरू होतील. अवैध धंद्यांच्या स्पर्धेतून पुन्हा एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असून पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक, अनेक खेड्यापाड्यांवर विशेषतः असोदा, भादली परिसरात होणारी अवैध मद्य विक्री, सट्टा, पत्त्यांचे अड्डे सर्वाधिक असून पोलीस त्यांच्यावर कारवाईसाठी कोणतेही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. तालुका पोलिसांवर अनेकदा नागरिक अवैध धंदे चालकांशी आर्थिक लागेबांधे असल्याचे आरोप देखील करतात तरीही परिस्थिती जैसे थे आहे. काही महिन्यांपूर्वी कलेक्शन करण्यावरून देखील दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता आणि त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी थेट पोलीस निरीक्षकांवर आरोप केले होते. तरीही निरीक्षक आणि कर्मचारी त्याठिकाणी आपली खुर्ची शाबूत ठेवून आहेत.