जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । अमळनेर शहरातील निसर्गरम्य अंबर्षी टेकडीवर गुरुवारी सायंकाळी पुन्हा बाराव्यांदा आग लागली. परंतु, अग्निशामक दलाचे कर्मचारी वेळीच पोहोचल्याने आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत अनेक झाडे जळाली आहेत.
शहराच्या पश्चिमेस अंबर्षी टेकडीवर जवळपास ४० हजार झाडे लावण्यात आली आहेत. यापूर्वी काही समाजकंटक व मद्यपी, विडी-सिगारेट शौकिनांमुळे तब्बल ११ वेळा या ठिकाणी आग लागली आहे. टेकडी ग्रुप सदस्य, समाजसेवक व प्रशासन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी ही झाडे जगवण्यात आली आहे. त्यांना पाणीपुरवठा यंत्रणेतून वाया जाणारे पाणी दिले जाते. दरम्यान, सायंकाळी अचानक टेकडीवरून धूर निघू लागल्याने टेकडी ग्रुपच्या सदस्यांची धावपळ झाली. पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी तत्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशमन दल प्रमुख नितीन खैरनार, फायरमन दिनेश बिऱ्हाडे, चालक जाफर शेख यांनी तत्काळ ही आग विझवली. मात्र, तोपर्यंत अनेक झाडे जळून गेली. यापूर्वीही अनेक जीवंत मोठी झाडे जळाली आहेत. दरम्यान, कुणीतरी हेतुपुरस्सर ही आग लावत असल्याचा आरोप सदस्यांनी केला असून त्यांच्यावर पालिका तसेच पाेलिस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.