⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

धक्कादायक : शालिमार एक्सप्रेसच्या बोगीला आग, नाशिक स्थानकावरील घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२२ । नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकरोड रेल्वे (Nashik Road railway station) स्थानकात उभ्या असलेल्या शालिमार एक्सप्रेसच्या एका बोगीला आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडलीय. अवघ्या काही मिनिटातच आगीचे लोळ पसरले आणि प्रचंड धूरच धूर झाला. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून त्यांनी हातातलं सामान टाकून जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून पळ काढला. या आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. आगीवर नियमंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.

काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार-हावडा एक्सप्रेसला ही आग लागली आहे. प्रवासी गाडीला आग लागल्याने प्रवाशांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, शालिमार-हावडा एक्सप्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात पोहोचताच ही आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांची धावपळ उडाली. या एक्सप्रेसच्या लगेज बोगीला ही आग लागली. या एक्सप्रेसमध्ये एकूण चार डबे लगेजचे असल्याने या घटनेत मनुष्यहानी झालेली नाही.

मात्र, या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एक आणि दोन चालू राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे. रेल्वे स्थानकावरील हेड वायर तुटल्याने तूर्तास प्लॅटफॉर्म नंबर तीन वरील रेल्वे सेवा दुसऱ्या बाजूने वळविण्यात आल्याची माहिती देखील प्रशासनाकडून मिळाली आहे.