जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । अमळनेर तालुक्यातील शिरूड व मंगरूळ येथे ३० रोजी लागलेल्या आगीत किरकोळ नुकसान झाले आहे. अग्निशमन दल वेळेवर पोहाेचल्याने आगीवर नियंत्रण मिळाल्याने दोन्ही गावात मोठे नुकसान टळले आहे. तर मंगरूळ येथील आगीत गाय जखमी झाली आहे.
अधिक माहिती अशी की, शिरूड येथे सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास खळवाडीस आग लागली. गावातील नागरिक व तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हवेचा वेग अधिक असल्याने आग वाढत गेली. शेवटी अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी वेळेवर येवून आगीवर नियंत्रण मिळवले. तर बाजूला असणाऱ्या नागरी वस्तीत अागीमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु, जवळपास तीन जणांचे उकिरडे जळून खाक झाले आहेत. तर दुसरी घटना मंगरूळ बस स्थानकाजवळ दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या ठिकाणी उच्च दाबाच्या वीज वाहिनीची तारा पडून आग लागली. हवेच्या वेगामुळे या आगीने राैद्ररूप धारण केले. बाजूच्या खळ्यात बैलजोडी व एक गाय बांधलेली होती. परंतु, आग विझवण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. कारण बाजूलाच आगीजवळ विजेची तार तुटून पडली होती. परंतु, अशा परिस्थितीत गावातील तरुणांनी मोठ्या धाडसाने बैलांचे दोर कापून त्यांचे प्राण वाचवले. तर तेथेच बांधलेल्या गाय आगीजवळ असल्याने गायीच्या एका कानाला व डोळ्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. मंगरूळ येथील जखमी गाईला वाचवण्यासाठी गोरख पाटील, मिलिंद पाटील, रावसाहेब पाटील, राजेंद्र पाटील आदींनी प्रयत्न केले. अग्निशमन दल प्रमुख नितीन खैरनार, चालक जाफर खान व फायरमन परेश उदेवाल, योगेश धनगर यांनी दोन्ही ठिकाणी आग विझवली.