जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२६ । सावदा शहरातील बसस्थानक परिसरातील ‘भारत गादी भंडार’ या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी (दि. १३ मार्च) दुपारी घडली. या आगीमुळे दुकानातील गाद्या व इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदा बसस्थानक परिसरात असलेल्या भारत गादी भंडार या दुकानातून दुपारी अचानक धूर व ज्वाळा बाहेर येताना दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने सावदा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला याची माहिती दिली.

माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. वेळीच कारवाई केल्यामुळे आग शेजारील दुकानांपर्यंत पसरण्यापासून रोखता आली.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील मोठ्या प्रमाणावर गाद्या आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास सुरू आहे.












