जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । पारोळा शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेत वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे नऊ झोनचे रोटेशन चुकून, शहराला १० ते १२ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा होतो. याबाबत नागरिकांसह छावा संघटनेने पालकमंत्री जिल्हाधिकारी व मजीप्रकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पाणीपुरवठा यंत्रणेच्या तपासणीसाठी मजीप्रच्या पथकाला बुधवारी पाचारण केले. पथकाने जलशुद्धीकरण केंद्र, तामसवाडी धरणासह पाणीपुरवठा विभागात पाहणी केली.
शहरात हिरव्या रंगाचा व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने, छावा संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी मजीप्राच्या पथकास पाचारण केले. पथकाने पाहणी करून पाणीपुरवठा यंत्रणेबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी करून पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर केल्या जाणार आहेत.
पाणी उकळून, गाळून प्यावे
पथकाने केलेल्या सूचनेनुसार बोरी धरणातला गाळ काढण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाशी चर्चा केली जाईल. शहरात सध्या होणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य आहे. नागरिकांनी पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी केले आहे.