जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर रविवारी १मे रोजी सभा संपन्न झाली. सभेत भोंग्याप्रकरणी दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही तास बाकी असताना महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
महाराष्ट्र दिनानिमित्त या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला परवानगी देण्याआधी औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. या अटी किंवा नियमांचं पालन झाल नाही तर पोलीस कारवाई करतील, असा इशाराही देण्यात आला होता. रविवारी राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर सोमवारी पोलिसांकडून या भाषणासंबंधीचा सर्व डेटा गोळा करण्यात आला. तसेच सभेच्या ठिकाणी कोणत्या अटींचं पालन झालं, कशाचं उल्लंघन झालं. याविषयीचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल गृहखात्याकडे पाठवण्यात येणार होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांतर्फे राज ठाकरे तसेच आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. अखेर आज राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.