⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, जिल्हा रुग्णालयात गोंधळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । शहराकडून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांडोरखोरी उद्यानाजवळ गुरुवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास दुचाकीचा कट लागल्यावरून चार तरुणांमध्ये वाद झाला. चौघे तरुण आरटीओ ट्रॅकला पोहचताच त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले असता त्याठिकाणी देखील वाद निर्माण होत होता परंतु मोहाडीचे सरपंच धनंजय उर्फ डंपी सोनवणे यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

मोहाडी रस्त्यावर असलेल्या शासकीय महिला रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या चाचणी मैदानावर गुरुवारी सकाळी वाहनचालकांची चाचणी सुरु होती. ११ वाजेच्या सुमारास जळगावकडून मैदानाच्या दिशेने चारचाकीने जात असलेल्या तरुणांचा कट मोहाडीकडून येत असलेल्या दुचाकीचालक तरुणांना लागला. चारचाकी चालक न थांबल्याने दुचाकी चालक तरुण त्यांचा पाठलाग करीत चाचणी मैदानावर पोहचले.

मैदानावर दोघांचा वाद वाढल्याने हाणामारी सुरु झाली. यावेळी दुचाकी चालकांचे मित्र मोहाडी गावातून आल्याने दोन गटात तुफान हाणामारी सुरु झाली. या हाणामारीमध्ये आदील शेख शकील, आतीक शेख आणि सौरभ नन्नवरे हे तीन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती कळताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोधी हे देखील घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस पोहोचण्याअगोदरच जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. दरम्यान, वाहन चालकांची चाचणी घेणारे अधिकारी आणि कर्मचारी मैदानावर वेळेवर उपस्थित असते तर हाणामारी रोखली गेली असती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

हाणामारीत जखमी झालेल्यांना जिल्हा रूग्णालयात आणले असता दोन्ही गटातील तरुणांची गर्दी त्याठिकाणी जमली. जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण होऊन दोन्ही गटात पुन्हा वाद सुरु झाला. यावेळी मोहाडीचे सरपंच धनंजय उर्फ डंपी सोनवणे यांच्यासह उपस्थित पोलिसांनी धाव घेत मध्यस्थी केली. काही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात तोडफोड देखील करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या दोन्ही गट शांत झाले असले तरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.