⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

गौरवास्पद : एरंडोलमध्ये ओल्या कचऱ्यापासून निर्मित खताला मिळाला ‘हरित ब्रॅण्ड’

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । एरंडोल नगरपालिकेतर्फे शहरातून पाच घंटागाड्यांद्वारे ओला व सुका या प्रकारचा कचरा संकलन करण्यात येत असून यामधील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. पद्मालय रोड येथील, पालिकेच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रावर ही खतनिर्मिती केली जात असून तयार झालेल्या खताची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी च्या प्रयोगशाळेतून चाचणी करून, त्याचा अहवाल महाराष्ट्र शासनास हरित ब्रॅण्ड प्राप्त करण्यासाठी सादर करण्यात आला होता. या खताची पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एरंडोल पालिकेच्या खतास ‘हरित महासिटी कंपोस्ट ब्रॅण्ड’ दर्जा प्रदान केेला आहे.

मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले एरंडोल पालिकेने तयार केलेले खत हे सेंद्रीय पद्धतीचे अाहे. रासायनिक शेतीपासून होत असलेल्या निसर्गाच्या हानीस वाचवण्याचा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये कार्यालय अधीक्षक तथा नोडल अधिकारी हितेश जोगी, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, समन्वयक विवेक कोळी, सर्व न.पा.कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

खताच्या विक्रीतून दीड लाखाचे उत्पन्न
पालिकेच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रावर तयार करण्यात आलेले खत हे उत्तम दर्जाचे असून, हे खत परिसरातील शेतकऱ्यांना अत्यल्प दराने उपलब्ध करून देण्यात आलेले अाहे. मागील सहा महिन्यात एक लाख ५२ हजार रुपयांची विक्री केली आहे.