⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

शेतकऱ्यांची फसवणूक; खत कंपनी, विक्रेत्यांसह डिलर्सचा परवाना निलंबित

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२३ । शेतकऱ्यांची फसवणूक करणारी केमिकल कंपनी, खत व्यापारी, किरकोळ विक्रेते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंगल सुपर फॉस्फेट खतांमुळे शेतकऱ्यांना बऱ्याच नुकसानाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संबंधित कंपनी, विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचा परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जामनेर तालुक्यातील २२५ शेतकऱ्यांचे सरदार ॲग्रो फर्टीलायझर केमिकल प्रा. लिमिटेड (गुजरात) कंपनीचे खत वापरल्याने नुकसान झाले होते. याबाबत कृषी विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे ४२३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. याबाबतीत तोंडापूर येथील शेतकऱ्यांनी जामनेर पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.

तत्काळ पाल कृषी प्रशिक्षण केंद्र यांनी जामनेर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची पाहणी करून जागेवर पंचनामा केला व शेतकऱ्यांच्या शेतातील व तोंडापूर येथील बालाजी ट्रेडर्स या दुकानातून खताचे नमुने घेऊन हैदराबाद व नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्याची दखल घेत सोमवारी जामनेर येथील खत निरीक्षकांच्या निरीक्षणाखाली सरदार फर्टिलायझर केमिकल कंपनी, पार्श्वनाथ ॲग्रोटेक कानळदा जळगाव येथील डीलर, बालाजी ट्रेडर्स (तोंडापूर), धनलक्ष्मी कृषी केंद्र (तोरनाळा), अभिषेक कृषी केंद्रीय (मोयखेडा) व जामनेर तालुक्यातील तीन किरकोळ विक्रेते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरदार ॲग्रो फर्टिलायझर ॲण्ड केमिकल प्रा. लिमिटेड कंपनीच्या उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेट खतामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे तालुका तक्रार निवारण समिती अहवालात निष्कर्ष नोंदविलेला असल्यामुळे या विक्रेत्यास देण्यात आलेले खत विक्री प्राधिकरण पत्र १५ फेब्रुवारी २०२८ पर्यंत कंपनीचा खत परवाना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश विकास पाटील संचालक कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून देण्यात आला आहे.