Jalgaon : 5 हजाराची लाच स्वीकारताना महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जुलै 24, 2025 6:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२५ । जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लाचखोरीची घटना समोर आलीय. पगार बिलावर सही करून ते पुढे पाठवण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी ५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण महिला अधिकाऱ्याला एसीबीने रंगेहात पकडले. माधुरी सुनील भागवत (वय ३८, रा. पिंप्राळा, जळगाव) असं लाचखोर महिला अधिकाऱ्याचं नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

lach jpg webp

तक्रारदार हे जळगावातील शासकीय दिव्यांग संमिश्र केंद्र येथे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. १४ जुलै २०२५ रोजी तक्रारदार हे जून महिन्याच्या पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा परिषद येथील जिल्हा दिव्यांग विभागात गेले होते. तेथे त्यांनी आलोसे माधुरी भागवत यांची भेट घेतली. त्यावेळी माधुरी भागवत यांनी तक्रारदारांच्या पगार बिलामध्ये कोणतीही त्रुटी न काढता त्यावर सह्या करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्यासाठी १२ हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २२ जुलै रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीनुसार, २२ जुलै रोजी पडताळणी करण्यात आली असता, माधुरी भागवत यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी करून, तडजोडीअंती प्रथम हप्ता म्हणून ५ हजार रुपये आणि उर्वरित ५ हजार रुपये इतर बिले निघाल्यावर देण्यास सांगितले. पंचासमक्ष लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

आलोसे यांच्या मागणीप्रमाणे २४ जुलै रोजी माधुरी भागवत यांनी तक्रारदारांकडून ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. सदर घटनेबाबत आलोसे माधुरी भागवत यांच्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now