⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने शेतातच घेतले विष

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथील बाळू बुधा पाटील या ५२ वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातच विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दि.२२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली होती. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

मयत बाळू पाटील यांचा भाचा चंद्रकात पाटील रा.ममुराबाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा शिवारात बाळू पाटील यांचे तीन बीघे शेत आहे. यंदा त्यांना बागायती शेती केली आहे. त्यासाठी सोसायटीचे तर इतरांकडून हातऊसनवारीने त्यांनी अडीच ते तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. यावर्षी शेवटी शेवटी झालेल्या सततच्या पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पन्न येणार नसल्याच्या ताणतणावातून दि.२२ सप्टेंबर रोजी बाळू पाटील यांनी त्यांच्याच शेतात फवारणी औषध प्राशन केले.

बाळू पाटील यांनी विष घेतल्याचा प्रकार शेतात काम करणार्‍या महिलांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबियानी बाळू पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. पाच दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरु होते. सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास बाळू पाटील यांची प्राणज्योती मालवली. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी पंचनामा केला.

शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत बाळू पाटील यांच्या पश्‍चात पत्नी सरला, मुलगी रचनाा व मुलगा तुषार असा परिवार आहे. दोन्ही मुलेही शिक्षण घेत आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.