चर्चा तर होणारच ! सुनबाईंसाठी सासऱ्यांनी पाठवलं चक्क हेलिकॉप्टर

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२३ । आपलं लग्न हे अनोख्या पद्धतीने व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. काही लग्न असे असतात ते खूपच चर्चेत असतात. अशीच जळगावात सध्या एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे अमळनेर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलाणी यांनी आपल्या लाडक्या सुनेला चक्क हेलिकॉप्टरवर अहमदनगर येथून अमळनेरात आणले आणि तिचे जंगी स्वागत केले. हे पाहून सूनदेखील भारावली होती.

अमळनेर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सरजू गोकलानी यांच्या मुलगा आशिष यांचा विवाह अहमदनगर येथील प्रसिद्ध उद्योजक संजय चंदानी यांची मुलगी सिमरन हिच्याशी आज शुक्रवार, १० फेब्रुवारी रोजी अमळनेर शहरात पार पडत आहे. हा विवाह सोहळा आज पार पडत असला तरी विवाहापूर्वी वधू मुलगी ही लग्नाच्या ठिकाणी हेलिकॉप्टर मधून आल्याने या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, याचा एक व्हिडीओ लोकमतच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे

हेलिकॉप्टर पाठवून आशिषने व त्याच्या वडिलांनी नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का दिला. अहमदनगर येथून चक्क हेलिकॉप्टर मध्ये बसून नवरी मुलगी सिमरन व तिच्या कुटुंबियांचे अंमळनेर आगमन झाले. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले त्या ठिकाणी सिमरनच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.

यानंतर दोघेही जोडपे सुरुवातीला अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेले या ठिकाणी त्यांनी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर पुष्पृष्टी करत सर्वांचेच लक्ष वेधले.