वन्यप्राण्यांमळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे होत आहे मोठे नुकसान
जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२२ | जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामध्ये वाडे शिवार या परिसरात शेतामध्ये वन्यजीव घुसल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी वनविभागाने तत्काळ शेतीचा पंचनामा करावा अशी मागणी या शेतकऱ्याची आहे. अचानक झालेला या वन्य जीवाचा हल्ल्यामुळे शेतकऱ्याचा हाथा तोंडाचा घास हिसकावून जायची परिस्थिती आली आहे.
अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रानडुक्कर पाहायला मिळतात. यातीलच एका डुकराने दिनकर पाटील या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतीचा नुकसान केले. शेतकऱ्याची मक्याची शेती उद्ध्वस्त करून दिली. अशावेळी वनविभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.दिनकर पाटील या शेतकऱ्याचे १ एकरवरील मका पिकापैकी अर्धा एकरवरील पिकाचे रानडुकरांनी नुकसान केले आहे. २५ हजारांच्या जवळपास हे नुकसान आहे. बाजूच्या शेतातील संजय बैरागी, नाना मोरे यासह अन्य शेतकऱ्यांच्या मका पिकाचेही नुकसान रानडुकरांनी केले आहे. आताही नुकसानीचे सत्र सुरुच आहे. संपूर्ण पिकाचे नुकसान होईल, अशी धास्ती या शेतकऱ्यांना आहे.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये मोठा खर्च करून पीक वाढवली आहेत. आता हीच पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता वन्यजीवांच्या संकटामुळे देखील शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पिके वाचावेत अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.