⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

पेशवेकालीन जागृत देवस्थान ‘तरसोदचा गणपती’

जळगाव लाईव्ह न्यूज । रजत भोळेजळगाव जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पद्मालयचे उजव्या-डाव्या सोंडेचे गणराया सर्वांनाच परिचित आहे. पद्मालयचे पूर्ण स्वरूप नशिराबादजवळच असलेल्या ‘तरसोद’ या गावी असलेले गणरायाचे मंदिर मानले जाते. पेशवेकालीन वारसा लाभलेल्या, मराठ्यांच्या फौजा उत्तरेकडे जातांना विश्रांतीसाठी थांबत असलेल्या तरसोदच्या गणरायाचा महिमा आज आपण उलगडणार आहोत.
जळगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर तरसोद फाटा आहे. या फाट्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर पेशवे कालीन गणरायाचे जागृत देवस्थान म्हण्जेचज तरसोदचा गणपती आहे. संपूर्ण जळगाव जिल्हयातील भाविक संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारिका चतुर्थी तसेच गणेशोत्सवात आवर्जून येथे येत असतात. गणपती मंदिराचे द्वार अगदी लहान असल्याने भाविकांना मंदिरात जाण्यासाठी वाकून जाऊन दर्शन घ्यावे लागते. मंदिरात गणरायाची मूर्ती भव्य आणि तेजस्वी आहे.


जळगावात कोणतीही निवडणूक असो प्रचाराचे नारळही तरसोदच्या गणरायालाच आधी फोडले जाते. तर जिल्ह्यातील नवदाम्पत्य आवर्जून या गणपतीचे दर्शन घेतात व त्यांच्या संसाराला लागतात. गावाच्या बाहेर शेती शिवारात असलेल्या गणपतीचे भव्य मंदिर आहे. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज आणि नशिराबादचे परम पुज्य झिपरू अण्‍णा या तिघे महाविभूती नशिराबादच्या पश्चिमेला दोन कि.मी. अंतरावर असलेल्या ज्या चिंचेच्या महाकाय वृक्षाखाली असलेल्या गणपती मंदिराजवळ बसत तेच हे तरसोदच्या गणरायाचे मंदिर. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात याची नोंद सापडते.


नशिराबाद येथील भाविक पूर्वी संकष्टी चतुर्थीला पद्‍मालय येथे ‘अमोद व प्रमोद’ गणरायाच्या दर्शनासाठी जात असत. त्यावेळी तेथे पुज्य श्री गोविंद महाराज वास्तव्य करीत होते. त्यांनी पांडवकालीन पद्मालय येथील गणपती मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. एके दिवशी नशिराबाद येथील भाविकांना या सिध्दपुरूषांने सांगितले की, पद्मालय येथील देवालयाचे पूर्ण स्वरूप नशिराबादजवळच असलेल्या ‘तरसोद’ या गावी आहे. त्यानंतर परिसरातील भाविक तरसोद येथे दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला येऊन जागृत गणरायाचे पूजन करू लागले. काही दिवसांनी स्वत: पुज्य श्री गोविंद महाराज यांनी तरसोदच्या गणपतीची महापूजा केली, अशी आखायिका आहे.
मराठ्याच्या फौजा उत्तरेकडे मुलूखगिरी करण्यासाठी जात, तेव्हा या परिसरात विश्रांतीसाठी थांबत असत. त्याकाळी तरसोद- नशिराबाद या मार्गावर छोटेसे गणेश मंदिर होते. मन्यारखेडे, भादली बु।।, खेडी व नशिराबाद परिसरातील भाविक देवदर्शनाला यायचे. त्यावेळी हा भाग नाईक निंबाळकर या पंचकुळी मराठा सरदाराच्या ताब्यात होता. शिवरायांची पहिली पत्‍नी येसूबाई नाईक निंबाळकर घराण्यातीलच होत्या. असा ऐतिहासिक वारसा देखील तरसोदच्या जागृत गणरायाला आहे.


तरसोद गणपतीच्या विश्वस्थ मंडळाच्या वतीने येथे मंदिराच्या मागील बाजूस धर्मशाळा व मोठे दोन सभामंडप बांधण्यात आले आहे. आता तर विश्वस्थ मंडळाच्या वतीने मंदिरावर सामुहिक विवाहाची सोय करण्यात आली आहे. लग्नसराईत दररोज एका वेळी एक-दोन नव्हे 10 ते 12 विवाह लागतील, अशी सुविधा करण्यात आली आहे. अशी माहिती तरसोद गणपती संस्थानचे संचालक भगवान त्र्यबंक देवरे यांनी दिली.
मुक्ताईनगरला मुक्ताबाईच्या छोट्या वारीला जाणारे वारकरी तसेच शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणारी पायी वारी येथे दर्शनासाठी येथे थांबतात.

पहा मंदिराचा व्हिडिओ :