जळगाव लाईव्ह न्यूज । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 31 हजार 908 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 184.16 कोटी रुपये संबंधित बँकांच्या पूल खात्यात जमा करण्यात आले असून, ही रक्कम लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

या योजनेला 2 जून,2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर शासन निर्णयाद्वारे योजना जाहीर करण्यात आली असून 15 जुलै,2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेंच्या काही निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. जिल्ह्यातील एकूण 87 हजार 826 कर्जखात्यांपैकी 65 हजार 343 कर्जखाती पात्र ठरली असून, त्यांची पहिली यादी 25 जुलै,2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीतील 7 ऑगस्ट,2026 अखेर 50 हजार 515 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यापैकी 31 हजार 908 पात्र लाभार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात 184.16 कोटी रुपयांचा निधी संबंधित बँकांच्या पूल खात्यात मुंबई येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते जमा करण्यात आला असून, तो लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शासनाने योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. तसेच पहिल्या यादीतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यावरही लाभाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हयात कॅम्प आयोजित करण्याच्या नियोजनाबाबत 10 ऑगस्ट,2026 रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे.








