जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । अमळनेर तालुक्यातील 40 गावातील शेतकरी सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पासून वंचित असताना आमदार अनिल पाटील यांनी यासाठी सतत प्रयत्न करून पावसाळी अधिवेशनात जोरदार आवाज उठविल्याने शासनाने याची दखल घेत निधी वितरणासाठी दि.30 ऑगस्ट रोजी थेट शासन निर्णय काढल्याने शेतकऱ्यांचा मोकळा होऊन लवकरच खात्यावर जमा होणार आहे.
सदर निर्णय घेतल्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडी शासनाच्या काळात हा निधी वितरित करण्यास मंजुरी देणारे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा आताचे विरोधीपक्ष नेते ना अजितदादा पवार यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.दरम्यान 2019 पासून हा विषय प्रलंबित असताना आमदार अनिल पाटील यांनी आमदारकी ची सूत्रे हाती घेतल्यापासून शासन दरबारी सतत पाठपुरावा केला.
सुदैवाने ते सत्ताधारी आमदार असल्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वैयक्तिक आग्रह आमदारांनी धरला होता,अखेर हाय पॉवर कमिटी ने हा निधी वितरित करण्यास मान्यता दिल्याने शासनाने हे पैसे वितरित करण्यास मंजुरी दिली होती,मात्र त्यानंतर महाविकास आघाडी शासन संपुष्टात आल्याने हा पैसा मोकळा व्हावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी च्या शिष्टमंडळासोबत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे पैसा मोकळा करण्यासाठी आग्रह धरला होता.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील यावर जोरदार भाषण करून आवाज उठविला त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक झाले होते, दि 30 रोजी राज्यातील अतिवृष्टीचे थकीत पैसे देण्याचा शासन निर्णय काढताना अमळनेर तालुक्यातील 40 गावातील शेतकऱ्यांचा समावेश केल्याने सदर पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे,सदर निर्णयामुळे संबधीत शेतकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.तर आमदारांनी देखील मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.