⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत ऊर्जामंत्री राऊतांची विधानसभेत मोठी घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या वीजतोडणीचा मुद्दा चांगलाच गाजला. प्रकरणावरुन अधिवेशनात आज विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. यानंतर विधानसभेत ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी एक मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. पीक हातात येईपर्यंत पुढील तीन महिने शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्पुरती थांबवण्यात येईल, अशी घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी विधासभेत केली.

मात्र, त्याचवेळी उर्जामंत्री राऊत यांनी इतर ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी वेळेत भरण्याची विनंती केली आहे. आम्हाला पॉवरलूम आणि विदर्भ-मराठवाड्यातील उद्योगांना वीज अनुदान द्यावे लागते. महावितरणची ही आर्थिक अडचण लक्षात घेऊन ग्राहकांनी थकीब बिले वेळेवर भरावीत, असे आवाहन नितीन राऊत यांनी केले.

आज मंगळवारच्या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या सत्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचे काय झाले, असाव सवाल करत शेतकरी कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला. या प्रश्वावरून विधानसभेत एकच गोंधळ सुरु झाला आणि सभागृहाचं कामकाज दुपारी एक वाजता स्थगित करावं लागलं.

पाच ते दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर कामकाज पुन्हा सुरु झाले. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही मोठी घोषणा केली. ते म्हणाले, ‘तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आमच्या सरकारने शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यावी हे उद्दीष्ट समोर ठेवून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन सांगू इच्छितो की, वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी तीन महिने कृषी वीज ग्राहकांची वीज तोडणी आम्ही तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.