जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२६ । विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्तेत असलेल्या महायुतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिलं होते. मात्र अद्याप शेतकरी कर्जमाफी झालेली नव्हती. मात्र अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.

त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर केली असून, या योजनेत शेतकऱ्यांना पीक कर्जावर २ लाख रुपयांपर्यंत माफी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

गेल्य़ा काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच तापला होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती. अखेर आता याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना सांगितले की, ‘आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी आम्ही समिती गठीत केली आहे. राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे.
जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित परतफेड केलेली असल्यास अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल.’












