⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

विचखेडे येथे शेतकऱ्याचा संसार खाक, तिघे बचावले : बकऱ्या, बोकडांची राख!

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । पारोळा तालुक्यातील विचखेडे येथे शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागल्याची घटना आज सोमवारी पहाटे वाजेच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्याच्या चार बकऱ्या व दोन बोकडांचा होरपळून मृत्यू झाला व संसारोपयोगी वस्तू जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत असे की, विचखेडे येथे सुपडू एकनाथ सूर्यवंशी हे सोलर प्रकल्प येथे वाॅचमन म्हणून कामाला गेले होते. घरात पत्नी व दोन मुले झोपली होती. त्यावेळी घराला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच महिलेने घरातून मुलांसह पळ काढला. आरडाओरडा करीत शेजाऱ्यांना बोलवले. यावेळी संपूर्ण गावातील लोक मदत कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले; परंतु आग जोरात असल्याने आटोक्यात येत नव्हती.

नंतर पारोळा नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागवण्यात आला. चालक मनोज पाटील व सहकाऱ्यांनी आग विझवली. पण अंगणात बांधलेले दोन बोकड, पाच बकऱ्या, पाच कोंबड्या, टीव्ही, खाट, कपडे आदी घरातल्या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घराचे छतदेखील पडून गेले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे.

यावेळी घटनास्थळी उपसरपंच पंकज बाविस्कर यांनी पाहणी करून दोन हजार रुपयांची मदत केली. तलाठी सचिन आठोले, पोलीस सरपंच आदींनी घटनेचा पंचनामा केला.