⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | पारोळा | पारोळ्यात सापडले ४०० वर्षांपूर्वीचे भुयार; राणी लक्ष्मीबाईंशी आहे संबंध

पारोळ्यात सापडले ४०० वर्षांपूर्वीचे भुयार; राणी लक्ष्मीबाईंशी आहे संबंध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १४ मार्च २०२३ | पारोळा शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्यामुळे पारोळा शहराचे नाव संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. या शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला शहराच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो. या इतिहासात आता एक भर पडली आहे. पारोळा शहरातील आझाद चौकात सुशोभिकरणासाठी खोदकाम सुरु असतांना अवघ्या ५ ते ६ फुटांवर मजुरांना ऐतिहासिक भुयार आढळले आहे. हे भुयारत तब्बल ४०० वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज आहे. याचा संबंध थेट राणी लक्ष्मीबाईंच्या काळाशी आहे.

आझाद चौकात खोदकाम सुरु असतांना मजुरांना भुयार दिसून आले. पाच ते सहा फुट उंचीच्या या भुयारातून पायी चालता येईल, अशी रचना करण्यात आलेली आहे. इतिहासातील नोंदींनुसार भुईकोट किल्ल्यात तीन ते चार किमीची भुयारे बनविण्यात आली होती. ब्रिटिशांपासून बचाव करण्यासाठी राजे जहांगीर व राणी लक्ष्मीबाई यांनी हे भुयार बनवून घेतली आहेत. आता आढळून आलेले भुयार हे सध्याच्या शहराच्या मध्यवर्ती भागातून जाते. पारोळा शहराचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराजांचा रथ भुयार आढळलेल्या मार्गावरुन जातो.

एका भुयारातून राणी लक्ष्मीबाई पारोळ्यातून बाहेर पडल्या होत्या

सदाशिवराव नेवाळकर यांनी शहराची स्थापना सतराव्या शतकादरम्यान केली. झांसीच्या राजाचा एक चुलत भाऊ गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच राणी लक्ष्मीबाईंचे पती, गंगाधर यांनी पारोळा शहर सदाशिवराव यांना जहागीर म्हणून भेट दिले होते. राणीच्या माहेरचे वंशज म्हणजेच तांबे यांची काही घरे पारोळा गावात आहेत. इतिहासातील नोंदींवरून जहागिरदार हरी सदाशिव दामोदर यांनी पारोळा किल्ला इ.स.१७२७ मध्ये बांधला. त्या वेळी किल्ल्याच्या परिसरात ५० घरांची पेंढारांची वस्ती होती. आजही पारोळा गावचा एक भाग पेंढारपुरा म्हणून ओळखला जातो.

या गावाला चारही बाजूंनी तटबंदी होती. या तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील व मुख्य दरवाजा. अन्य दरवाजांची नावे धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अंमळनेर दरवाजा अशी आहेत. येथील किल्ल्यावर महादेवाचे एक मंदिर आहे. या मंदिराजवळ एक मोठे भुयार असून त्याचा वापर जुन्या काळापासून होत असे. विशेष म्हणजे, या भुयारातून घोडेस्वार आत जात असे, असे स्थानिक रहिवाशी सांगतात. या भुयाराचे दुसरे तोंड आठ किलोमीटरवरील नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे म्हटले जाते. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.