प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । अनेक महिन्यापासून पाठपुरावा करुनही शेतीसाठी वीज कनेक्शन मिळत नसल्याने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमळनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.
याबाबत असे कि, अमळनेर तालुक्यातील सात्री येथील शेतकरी योगराज प्रल्हाद पाटील यांच्याकडे दहा बिघे एवढी शेती आहे. शेतीत मक्याचे पीक लावलं आहे. शेतात वीज कनेक्शन मिळावं यासाठी ते तब्बल १० महिन्यांपासून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले, मात्र त्यानंतरही कुठलीही कार्यवाही आतापर्यंत झालेली नाही.
दुसरीकडे वीज कनेक्शन नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पीक जळत आहे. होणाऱ्या नुकसानामुळे व महावितरण कंपनीचा कारभाराला कंटाळून योगराज पाटील या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात स्वतःवर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हापेठ पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सोडून देण्यात आले.
‘अधिकारी व गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेप यामुळे माझ्या शेतीसाठी वीज कनेक्शन मिळत नाही. त्यामुळे शेतातील पिके डोळ्यासमोर जळत असल्याने आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता,’ अशा शब्दांत शेतकरी योगराज पाटील यांनी आपली व्यथा मांडली आहे.
हे देखील वाचा :
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन
- जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाह्य साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
- जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
- महाराष्ट्रातील या भागात पावसाचा अंदाज: शेतकऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला..