दिवाळीपूर्वीच खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून भाडेवाढ ; जळगाववरून कोणत्या मार्गावर किती भाडे?

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२३ । दिवाळी सारखा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी अनेक जण कुटुंबासह गावी जातात. मात्र, यादरम्यान, रेल्वेचे आरक्षण फुल्ल असल्याने अनेकजण एस.टी. किंवा खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देतात. मात्र ही संधी साधत ट्रॅव्हल्स मालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते.

दिवाळी सणाला दोन आठवड्याचा कालावधी उरला असला तरी खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी आत्तापासूनच भाडेवाढ केली आहे. जळगाववरून पुण्यासाठी एक हजार रुपये तर नागपूरसाठी दोन हजार रुपयांचे भाडे आकारले जात आहे. नियमापेक्षा जास्त भाडे घेणाऱ्या ट्रॅव्हल्सची तक्रार केल्यास कारवाई करण्याचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.

पुणे, मुंबई, नागपूरसह सुरत या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा रहिवास आहे. सण आणि उत्सवांच्या या काळात या भागातील नोकरदार हे गावाकडे येत असतात. या काळात रेल्वे आरक्षण फुल असल्याने एस. टी. ज किंवा खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देतात. मात्र ही संधी साधत जळगावात ट्रॅव्हल्स मालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट केली जाते.

दरवर्षी दिवाळीपूर्वी दहा ते बारा दिवस भाडे वाढ केली जात असल्याची तक्रार प्रवाशी करत असतात. ऐन दिवाळीत जे भाडे असेल ते देऊन प्रवाशांना प्रवास करावा लागतो.

कोणत्या मार्गावर किती भाडे?
सध्या पुण्यासाठी ८०० ते १०० रुपये भाडे आकारले जात आहे. मात्र ९ नोव्हेंबर रोजी परतीसाठी २२०० ते २५०० रुपयापर्यंतचे भाडे आकारले जाते. तर नागपूरसाठी सध्या ९०० ते ११०० रुपये आहे. मात्र ९ नोव्हेंबर रोजी परतीसाठी ११०० ते २००० रुपयापर्यंतचे भाडे आकारले जाते. सुरतसाठी ५०० ते ७०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. मात्र ९ नोव्हेंबर रोजी परतीसाठी ८०० ते १२०० रुपये आकारले जाते. मुंबईसाठी सध्या ६०० ते ८०० रुपये भाडे आहे. ९ नोव्हेंबर रोजी तब्बल १२०० ते २००० रुपयापर्यंत भाडे आहे.