⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

सरकारी नोकरीचे आमिष पडले महागात; जळगावातील कुटुंबाला लावला २२ लाखाचा चुना

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२३ । फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशातच जळगावमध्ये ठगांनी एका कुटुंबाला २२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. मंत्रालय आणि रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. याप्रकरणी तीन जणांवर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमका काय आहे प्रकरण?
जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे प्रविणचंद पांडूरंग दिघोळे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून दिघोळे हे युनायटेड इंन्शुरन्स कंपनीत नोकरीला आहेत. धुळे येथे राहणारा त्याचा मित्र चंद्रभान जवरीलाल ओसवाल व त्याचा लहान भाऊ अनिल जवरीलाल ओसवाल यांच्याशी त्यांची १५ वर्षापासून ओळख आहे. त्यानुसार प्रविणचंद दिघोळे यांचा मुलगा राजकुमार दिघोळे याला मंत्रालयात चांगल्या पदावर नोकरी लावून देतो. असे सांगत ओसवाल भावडांनी २२ लाख रुपये द्यावे लागतील असे प्रवीणचंद दिघोळे यांना सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी सुरुवातीला १० मे २०१८ रोजी शिवकॉलनी येथे घरी ९ लाख रूपये दिले.

यावेळी ओसवाल भावडांनी उर्वरित पैसे लवकर द्यायला सांगितले. त्यानुसार दिघोळे यांनी २७ मे २०१८ रोजी पुन्हा ७ लाख रूपये दिले. दरम्यान, नोकरीसाठी जॉईनिंग ऑर्डरची दिली नाही म्हणून ओसवाल बंधुंना फोन केला असता दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत होते. याप्रकारे त्यांनी तब्बल दोन वर्षे टाळाटाळ केली. यानंतर १६ फेब्रुवारी २०२१ रोजी चंद्रभान ओसवाल हा दिघोळे यांच्या घरी आला. त्याने मंत्रालय मुंबईच्या नावाने झेरॉक्स असलेली बनावट ऑर्डर दाखविली, पर्यवेक्षक पदावर निवड झाल्याचे सांगत त्याने मुंबईला जावू व जॉईनिंग करु असे सांगितले. त्यानुसार दिघोळे दाम्पत्य मुंबईला गेले. मात्र याठिकाणी साहेब आजारी असल्याचे सांगत ओसवाल यांनी साहेबांशी भेट घडवून आणली नाहीय. त्यामुळे दिघोळे पुन्हा घरी आले.

त्यानंतर मुंबईला चंद्रभान ओसवाल आणि त्याचा मित्र हरताली प्रसाद रोहिदास यांनी मुलाला रेल्वे ज्युनीयर इंजिनिअर पदावर नोकरी लावून देतो, असे सांगत यासाठी आणखी ६ लाख रुपये लागतील, असे सांगितले. यानंतर मात्र, शेवटी ओसवाल भावंडे व हरताली या तिघांनी आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर प्रविणचंद दिघोळे यांनी 26 मार्च रोजी जळगाव शहरातील रामानंदनगर पेालिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन चंद्रभान जवरीलाल ओसवाल, अनिल जवरीलाल ओसवाल आणि हरताली प्रसाद रोहिदास (पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.