भुसावळात भरारी पथकाची मोठी कारवाई; बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । शहरातील शिवपूर कन्हाळे रस्त्यावरील कोटींग व फर्निचर प्लाँटमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारूचा कारखाना पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी उद्ध्वस्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पथकाने कारखान्यातून 350 टँगो पंच देशी दारूचे खोके, तीन ड्रम स्पीरीट, दारू सील करण्यासाठी लागणारे मशीन, रीकामे बुच, बाटल्या आदी मिळून सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. भुसावळातील रवी ढगे यांच्या मालकिचे हे गोदाम असल्याचे सांगण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला भुसावळातील शिवपूर कन्हाळे रस्त्यावरील व्हीआयपी कॉलनीजवळील गणेश पावडर व कोटींग या कारखानावजा गोदामात बनावट देशी दारू बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार चार वाहनांद्वारे पथकातील अधिकारी शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दाखल झाल्यानंतर त्यांनी कारखान्यावर कारवाई करीत सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल ट्रकमध्ये नेत जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्कचा कारभार ऐरणीवर
गत आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात सुमारे 89 लाखांचे बनावट मद्य जप्त करण्यात आले होते तर शनिवारी पुण्याच्या पथकाने भुसावळात येवून बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर स्थानिक व जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामगिरीवर संशय व्यक्त होत आहे. भुसावळातील कारखान्यातून आतापर्यंत नेमकी कुठे-कुठे दारू पुरवण्यात आली व या प्रकारात नेमके खरेदीदार कोण? याबाबतचा उलगडा होण्याची आवश्यकता आहे.