जळगाव लाईव्ह न्यूज : 2 नोव्हेंबर 2023 : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत फळ पीकविमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास 31 ऑक्टोबर अंतिम मुदत देण्यात आली होती. 31 ऑक्टोबर पर्यंत सुमारे 45 हजार 731 अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. काहि तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
धनंजय मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून, 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. धनंजय मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा, असे आवाहनही केले आहे.