जळगाव जिल्हाबातम्या

खान्देशातील रेल्वे प्रवाशांना दिलासा! भुसावळ-दादर एक्स्प्रेसला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत धावणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२५ । खान्देशातील (Khandesh) रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ-दादर (Bhusawal-Dadar Express) स्थानकांदरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. आता ही एक्स्प्रेस ३१ मार्च २०२५ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांमुळे भुसावळसह (Bhusawal) जळगावहून (Jalgaon) धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबारमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची गर्दीच्या हंगामात मोठी सोय होऊ शकणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या सेवेचा विस्तार करत असताना, खान्देशातील नंदुरबार-दादर दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय जून २०२४ मध्ये घेण्यात आला होता. मात्र, ठरल्यानुसार नवीन गाडी रूळावर येत नाही, तेवढ्यात ती नंदुरबारऐवजी थेट भुसावळहून सोडण्याच्या मागणीने जोर धरला. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनीही त्याबाबतीत पश्चिम रेल्वेकडे पत्रव्यवहार केला.

अखेर १९ जुलैपासून भुसावळ-दादर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ-दादर (०९०५२) या दोन्ही त्रिसाप्ताहिक विशेष गाड्या आठवड्यातून तीन दिवस सोमवारी, बुधवारी आणि गुरुवारी धावू लागल्या. तसेच दादर-भुसावळ (०९०४९ ) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावू लागल्या.

सुरूवातीला आठवड्यातून चार दिवस धावणाऱ्या गाड्यांना २७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, पुढे जाऊन प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता भुसावळ-दादर दरम्यानच्या रेल्वे गाड्यांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदतवाढ संपल्यानंतर पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने भुसावळ-दादर स्थानकांदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक व त्रिसाप्ताहिक गाड्यांना आता तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. पश्चिम रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, दादर-भुसावळ (०९०४९ ) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाड्यांचा कालावधी आता २८ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे. याशिवाय दादर-भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ-दादर (०९०५२) दरम्यान आठवड्यातून तीन दिवस सोमवारी, बुधवारी आणि गुरुवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button