⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जळगाव जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक वापरास सुट देण्याचे दिवस जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ जानेवारी २०२३ | सन 2023 मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत मर्यादा राखून व केंद्र शासनाच्या अधिसुचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे पालन करुन सकाळी 6.00 वाजल्यापसुन ते रात्री 12.00 वाजेपर्यंत सुट देण्याचे 15 दिवस जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी जाहीर केले असून तसे आदेश निर्गमित केले आहे.


जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शासकीय) 1 दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 1 दिवस, गणपती उत्सव 3 दिवस (पाचवा दिवस, सातवा दिवस व अनंत चर्तुदशी)/ईद ए मिलाद, नवरात्री उत्सव 1 दिवस (अष्टमी), दिवाळी 1 दिवस (लक्ष्मीपुजन), ख्रिसमस 1 दिवस, 31 डिसेंबर वर्षअखेर 1 दिवस याप्रमाणे 9 दिवस तर उर्वरीत 6 दिवसांची परवानगी राखीव ठेवली असून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार दिली जाईल असेही आदेशात म्हटले आहे.


केंद्र शासनाच्या अधिसुचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे उल्लंघन होणार नाही व त्यासाठी आवश्यक त्या उपयोजना करावयाच्या अटी व मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंबंधात दिलेल्या आदेशातील बाबींचे तंतोतंत पालन करावे, न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही तसेच कोणत्याही परिस्थितीत ध्वनी प्रदुषण नियम 2000 चे तंतोतंत पालन करण्यात यावे. नियमातील कोणत्याही तरतुदीचा भंग झाल्याचे आढळून आल्यास पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 15 अन्वये कारवाईस पात्र राहील. असेही जिल्हादंडाधिकारी श्री. मित्तल यांनी आदेशात म्हटले आहे.