जळगाव लाईव्ह न्युज | ९ मे २०२२ | जिल्हा बँकेने मधुकर सहकारी साखर कारखाना सिक्युटरायझेनशन ऍक्ट अंतर्गत ताब्यात घेतला असून, तो भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वसंत सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीवरील स्थगिती उठविण्यासाठी उच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेहीजिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी सांगितले. जिल्हा बँकेने आदिशक्ती मुक्ताई सहकारी सुतगिरणीला दिर्घ मुदतीवर ३० कोटी ३४ लाख रुपयांचे कर्ज संचालक मंडळाने मंजूर केले आहे.
एटीएमव्दारे कर्ज वाटप करण्यावरुन शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. ग्रामीण भागात एटीएमची संख्या मर्यादीत असल्याने शेतकर्यांनाही कर्जाची रक्कम काढतांना मोठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेता, जिल्हा बँकेने कर्ज वाटपाची ५० टक्के रक्कम ही रोखीने देण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीला व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे, संचालक एकनाथराव खडसे, संजय पवार, डॉ.सतीष पाटील, जयश्री महाजन, घनःश्याम अग्रवाल, अमोल पाटील, प्रताप हरी पाटील, मेहताबसिंग नाईक, शैलजा निकम यांच्यासह कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कर्ज वाटप ही एटीएमव्दारे करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे जिल्हा बँकेकडून जे कर्ज वाटप होत होते, ते एटीएमव्दारे शेतकर्याला काढावे लागत होते. मात्र, ग्रामीण भागातील एटीएमची मर्यादीत संख्या, रोकड नसणे, रक्कम काढण्यासाठी तालुक्यावर येणे यासारख्या अडचणी शेतकर्यांना भेडसावत होत्या. या संदर्भात लोकप्रतिनिधींनी देखील जिल्हा बँकेकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने कर्जवाटपाची ५० टक्के रक्कम रोखीने आणि उर्वरीत ५० टक्के एटीएमव्दारे देण्याचा दिलासादायक निर्णय घेण्यात आल्याची माहिती चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली.