⁠ 
शनिवार, मे 4, 2024

एरंडोल तालुक्यात डेरेदार वृक्षांची राजरोसपणे कत्तल

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । डेरेदार वृक्ष जनावरांसह मानवासाठी सावली, विश्रांतीची जागा असते. परंतू वनविभाग आणि अवैध वृक्षतोडीसाठी अर्थपूर्ण मूकसंमती हे जणू समिकरणच असल्याचे सर्रास बोलले जाते. तालूक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी डेरेदार, जिवंत वृक्षांना आगी लावून ती तोडली जातात ते थेट वखारींमध्येच. 

अर्थात यासाठी वनअधिकारी आणि कर्मचारींच्या संमतीशिवाय होईल का? एकीकडे शासन दरवर्षी करोडो झाडे लावण्याचा कार्यक़्रम जाहीर करून कोट्यावधींचा खर्च करते परंतू करंटे अधिकारी, कर्मचारीा मात्र आपली तुमडी भरण्यासाठी सोईस्कर दुर्लक्ष करून जिवंत झाडे तोडून पर्यावरणाचे मोठे नुकसान करतात यास म्हणावे तरी काय ? असा संतापजनक सवाल पर्यावरण प्रेमींसह कार्यकर्त्यांनी केला आहे. 

एरंडोलपासून जवळच असलेल्या पद्मालय जंगल तर अवैध वृक्ष तोडीमुळे ओसाड झाले आहे. अनेक वर्षांपूर्वी पद्मालय रस्त्याने रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद राहात असे परंतू आता वृक्षतोडीमुळे जंगलातील भितीच निघून गेली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी धरणगांव रोड लगतची झाडांना आग लावली (तोडण्यासाठी) परंतू पर्यावरणप्रेमींनी एरंडोल नपाची अग्निशमन दलाची गाडी मागवून आग विझवून झाडांना जिवदान दिले. तसेच पद्मालय रस्त्यालगत शेती असलेले शेतकरी महेंद्र श्रावण पाटील यांच्या बांधावरील तीन मोठी झाडे (50-60 फूट उंच) विघ्नसंतोषी व्यक्तींनी तोडली. डेरेदार झाडे सावली, विश्रांतीसाठीच होती. याबाबत एरंडोल वनविभागात तोंडी नंतर लेखी तक्रार देवून देखील दखल घेतली नाही. उलट तोडलेली झाडे दाखवा, तुमच्याकडून जे होईल ते करा अशी अरेरावीची भाषा केल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याचा अर्थ  वनविभागाची अर्थपूर्ण संमती असल्याशिवाय हे घडले नाही हेही तेवढेच खरे. वरीष्ठ अधिकारींनी देखील झोपेचे सोंग घेतले असल्याशिवाय  हे होणार नाही हेही तेवढेच खरे.

दरम्यान एरंडोल येथील वनविभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी कार्यालय याठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. याबाबतीत महेंद्र पाटील यांना आलेला कटू अनुभवाची क्लिप सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल होत आहे.