⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

एरंडोल नगर पालिकेने पटकावला स्कॉच सिल्व्हर पुरस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा स्कॉच सिल्व्हर पुरस्कार नुकताच एरंडोल नगर पालिकेने शाश्वत पर्यावरणाचा विकास या विषयात मिळवला आहे.

एरंडोल नगर पालिकेने शहरात पर्यावरणाच्या विकासाचा संघ बांधला आहे. त्यात उद्यान विकसित करणे, नदी स्वच्छता करणे, कचरामुक्त शहर बनविणे, अपारंपारिक ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे, प्लास्टिक बंदी करणे दैनंदिन घनकचरा संकलन करून व्यवस्थापन करणे असे कामे करण्यात येत आहे. या कामाचे नियोजन त्यामध्ये येत असलेल्या अडचणी व त्या अडचणींवर मात करून नगर पालिकेने केलेल्या विकास कामाचे प्रकल्प तयार करून राष्ट्रीय पातळीवरील स्कॉच संस्था दिल्ली येथे पाठविण्यात आले होते. प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून एरंडोल नगर पालिकेस प्रकल्पाची ऑनलाईन मांडणी करण्यास संधी देण्यात आली होती. मिळालेल्या संधीनुसार मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करण्यात आली. प्रकल्पाची ऑनलाईन मांडणी मुख्याधिकारी यांनी उत्कृष्ट रित्या करून नगर पालिकेने नागरिकांचे अभिप्राय व ऑनलाईन वोटिंग मधे चांगले प्रदर्शन करत उपांत्य फेरी मधे प्रवेश केला. अंतिम फेरीमध्ये देशातील मोठ-मोठ्या शहरांच्या प्रकल्पांशी स्पर्धा करून पर्यावरण या घटकात एरंडोल नगर पालिकेने सिल्व्हर अवॉर्ड मिळवला आहे. सदर पर्यावरण घटकाचा प्रथम गोल्ड अवार्ड गुजरात पोलुशन कंट्रोल बोर्ड यांना मिळाला. स्कोच अवार्ड करीता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी एरंडोल नगर पालिकेला माहिती देवून मार्गदर्शन केले होते. त्याबद्दल नगर पालिकेच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे आभार मानण्यात आले. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकारे सहभाग मिळालेल्या नागरिकांचे मुख्याधिकारी सो यांनी आभार मानले. भविष्यात अशाच प्रकारचा पर्यावरणाचा विकास करण्यावर भर दिला जाईल असे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.